उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील शुभम विजय काळभोर (वय-१८) याने ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’ वेटलिफ्टिंग प्रकारमध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. शुभमने मिळविलेल्या यशाबद्दल त्याच्यावर राजकीय, सामाजिक व क्रीडाक्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
इंदोर (मध्य प्रदेश) येथे‘खेलो इंडिया यूथ गेम्स २०२३’स्पर्धा ३० जानेवारीपासून सुरु आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. सध्या स्पर्धेत महाराष्ट्र हा अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेत सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटर या व्यायामशाळेचा लोणी काळभोर येथील विद्यार्थी शुभम काळभोर याने ६१ किलो वजनी गटात १०८ किलो ‘स्नॅच’ व १३२ किलो ‘क्लीन अँड जर्क’ असे २४० किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले आहे. यासाठी शुभमला प्रशिक्षक गणेश नगीने यांचे मार्गदर्शन मिळाले.
शुभम काळभोर यांचे वडील विजय काळभोर हे प्रगतशील शेतकरी असून त्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय शेती आहे. शुभम हा लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. शुभमच्या यशासाठी लोणी काळभोर व पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे प्राईम न्यूजशी बोलताना शुभम काळभोर यांनी सांगितले की, आजी-आजोबा,आई-वडील, भाऊ आणि प्रशिक्षक यांनी मार्गदर्शन केल्याने हे यश मिळाले आहे. कोणती स्पर्धा असो मला नेहमी मार्गदर्शन, प्रेरणा आणि बळ देण्यासाठी माझे आजोबा तुकाराम मारुती काळभोर हे सोबत असतात. त्यामुळे हे यश आजोबांच्या चरणी अर्पण करीत आहे. असे शुभम काळभोर याने सांगितले आहे.