सागर जगदाळे
भिगवण : कोबी पिकाला सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे उभे पीक नागंरण्याची वेळ भिगवण (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांवर आली आहे. इंदापूर तालुक्यात टोमॅटो, कोबी, फ्लॅावर आदी तरकारी पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. यामध्ये कोबी, टोमॅटो या पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या कोबी या पिकावरती रोटावेटर मारून कोबी पीक नष्ट केले आहे.
गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून कोबीचे दर हे अगदी कवडीमोल झाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेच आहे त्याचबरोबर केलेला खर्चही पूर्णपणे वाया गेला असल्याने कोबी पिक उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च करून पीक घेतले आहे. मात्र, सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे गुंतवलेले भांडवलही वसूल होत नाही. मजुरी, वाहतूक खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी कोबीच्या शेतांमध्ये रोटर फिरवला आहे. नगदी पीक म्हणून कोबी मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. दीड महिन्यांपूर्वी कोबीला बाजारभाव चांगला मिळत होता. परंतु, त्यानंतर बाजारभावात मोठी घसरण होत गेली.
दरम्यान, खराब वातावरणामुळे पडलेल्या रोगामुळे केलेला खर्च वाया गेला. त्यातूनही कसेबसे हे कोबी पीक वाचविण्याचा प्रयत्न केला पण आधीच निसर्गाने साथ सोडलेली त्यात बाजारभावाने ही दगा दिला. बाजारभावातून कोबी पिकासाठी गुंतवलेले भांडवल वसुल काढणीची मजुरी व बाजारपेठेपर्यंत नेण्याचा वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कोबी पिकाची काढणी थांबवली आहे. काही शेतकऱ्यांना इतर पिके घ्यायची असल्याने त्या शेतामध्ये त्यांनी रोटर फिरवला आहे.
याबाबत बोलताना तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील प्रयोगशील शेतकरी सुनील काळंगे म्हणाले, “कोबी चे पिक दहा गुंठे क्षेत्रात घेतले असून या पिकाला एकरी ३० ते ३५ हजार रुपये खर्च आला. कोबीचे पीक घेतले होते. त्यासाठी रोपे, खते, औषध फवारणीसाठी हजारो रुपये खर्च केला. त्यातून पीकही जोमदार आले. परंतु, सुरुवातीपासूनच बाजारभाव मिळाला नाही. गुंतवलेले भांडवल अंगावर आले. त्यामुळे मी कोबीच्या पिकात रोटर फिरविण्याचा निर्णय घेतला. पिकासाठी केलेला खर्च वाया गेला आहे.”