पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाला बंदी घालण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतला आहे.
राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी अजित पवार यांनी वरील विधान केले.
मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर अजित पवार यांनी या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राच्या संस्कृतीला यामुळे कमीपणा आणला जात आहे. महाराष्ट्राची काही परंपरा आहेत. ते सर्वांना पाहता येतील अशाप्रकारचे असले पाहिजेत. त्यात अश्लील प्रकार असता कामा नये. मी यासंबंधी संबंधितांशी बोलणार आहे. शक्य झाल्यास अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहे. महाराष्ट्राची परंपरा टिकली पाहिजे. कोणी चुकत असेल तर त्यांना अडवलं पाहिजे,” असं अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.