पुणे : डाटा व सीडीआर डाटा व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेकडे दीड लाखांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारका विरुद्ध गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ०२) ते ०५ फेब्रुवारी रात्री साडे आठ ते रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
याप्रकणी एका ३२ वर्षीय महिलेने सोमवारी (ता. ६) वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने फिर्यादी यांना तुमचा डाटा व सिडीआर डाटा आपल्याकडे असल्याचे सांगितले. तसेच हा डाटा फिर्यादी यांच्या पतीकडे व नातेवाईकांकडे व १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लग्न समारंभात स्क्रीनवर प्रसारित करण्याची धमकी दिली.
दरम्यान, डाटा प्रसारित करायचा नसेल तर सुरुवातीला ५० हजार आणि त्यानंतर एक लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी सोमवारी (ता. ६) वाकड पोलीस अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार मोबाईल धारकावर आयपीसी ३८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.