पुणे : वीजग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आणि वीजगळती कमी करण्यासाठी ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक विभागात चार हजार ४१८ कोटी रुपये खर्चून ३७ लाख ६८ हजारपेक्षा अधिक स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. या स्मार्ट प्रीपेड मीटरचे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना वीजपुरवठा होणार आहे.
केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत (आरडीएसएस) पहिल्या टप्प्यात पुण्यासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या चार प्रादेशिक विभागांमध्ये सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्चून स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (एएमआय) सेवा पुरवठादार नियुक्तीसाठी ‘महावितरण’ने निविदा काढल्या आहेत.
चालू वर्षात योजनेच्या पहिल्या टप्प्यांत पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी असलेल्या शहरांमध्ये शेतकरी वगळता अन्य ग्राहकांसाठी यंदाच्या वर्षांत स्मार्ट व प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांत २०२५ पर्यंत १५ टक्क्यांपेक्षा कमी वीजहानी असलेल्या शहरांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसविले जाणार आहेत.
पुणे प्रादेशिक विभागात प्रारंभी पुणे परिमंडळातील मंचर विभाग ; बारामती परिमंडळातील सासवड, सोलापूर शहर व ग्रामीण, बार्शी, वडूज, अकलूज, पंढरपूर विभाग; कोल्हापूर परिमंडळातील कवठे महांकाळ व विटा विभागांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या कामाला यंदाच्या वर्षांत प्रारंभ होणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यासह प्रादेशिक विभागाच्या उर्वरित विभागांत वीजहानी कमी असल्याने, योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांत तेथील वीजग्राहकांचे मीटर स्मार्ट व प्रीपेड होतील.
त्या अंतर्गत पुणे परिमंडळात एकूण २२ लाख ८७ हजार ३५० स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘महावितरण’च्या पुणे प्रादेशिक विभागातर्फे देण्यात आली.