शिक्रापूर : कौटुंबिक वादातून पत्नीला शिवीगाळ, दमदाटी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पाबळ (ता. शिरुर) येथे नुकतीच घडली आहे. याप्रकरणी पतीच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजीज बाबूलाल इनामदार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अजीजच्या पत्नी शबाना अजीज इनामदार (वय ४० रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शबाना इनामदार व अजीज इनामदार हे पती पत्नी आहेत. शबाना व अजीज यांच्यात घरगुती कारणावरून नेहमी भांडणे होत होती. दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अजीजने अचानक शबाना यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्यानंतर शबाना यांनी त्यांच्या आई वडिलांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर महिलेचे आई वडील आले असता, अजीज याने त्यांना देखील शिवीगाळ करत दमदाटी केली.
दरम्यान, याप्रकरणी शबाना इनामदार यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अजीज इनामदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार करत आहेत.