लोणी काळभोर (पुणे) : मोरगाव (ता. बारामती) येथील खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जात असताना, बसचा भोर चौपाटीजवळ ब्रेक फेल झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. परंतु, बस चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असून तब्बल ३४ विद्यार्थांचे प्राण वाचले आहे. सदर थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोरगावामधील खासगी क्लासच्या ३४ विद्यार्थ्यांची सहल रायगडला निघाली होती. विद्यार्थ्यांना घेऊन बस (क्रमांक एमएच १२ एचसी ९११९) ही भोर वरंधघाट मार्गे चालली होती. मांढरदेवीचे दर्शन घेतल्यानंतर भोरच्या चौपाटी जवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्यान बसचे ब्रेक निकामी झाले.
दरम्यान, बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवून धावत्या बसमधून खाली उडी मारली. आणि बसच्या चाकाखाली दगड टाकले. आणि त्यानंतर बसवर नियंत्रण मिळवण शक्य झाले. आणि मोठा अपघात टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ३४ विद्यार्थांचा जीव वाचला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.