औरंगाबाद : इंग्लंडचा एडवर्ड औरंगाबादच्या सांचीच्या प्रेमात पडला. दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीने हा विवाह सोहळा औरंगाबाद येथे पार पडला. या आगळ्या-वेगळ्या लग्नाची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
औरंगाबादची सांची रगडे ही इंग्लंडमध्ये २०१९ पासून शिकण्यासाठी होती. त्यावेळी तिची ओळख एडवर्ड याच्याशी झाली. ओळखीतून एडवर्ड हा सांचीच्या प्रेमात पडला. दोघांनीही लग्न करण्याचे ठरविले. विशेष म्हणजे दोघांच्या कुटुंबाने ते मान्य करीत लग्नाला होकार दिला. यानंतर भारतीय पद्धतीने औरंगाबादमध्ये लग्न करण्याचे ठरले.
मुलगी महाराष्ट्रीय, तर मुलगा थेट इंग्लंडचा. इंग्लंडचे क्लेश कुटुंबीय अगदी भारतीय वेश परिधान करुन लग्नात सहभागी झाले आणि भारतीय गाण्यावर थिरकले देखील. एडवर्ड आणि रगडे कुटुंबीयाने एकत्र येत शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न पार पाडले. भारतीय बौद्ध पद्धतीने दोघांचा विवाह झाला. वरात देखील निघाली आणि वरातीत एडवर्डच्या संपूर्ण कुटुंबाने भारतीय गाण्यावर ठेका धरला होता.
ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एका तासाचे काम असते मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांचा सोहळा आहे. हे सगळं आनंदादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या वडिलांनी दिली आहे. तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्न झाल्याने आनंद होत असल्याचे सांगितले.
दरम्यान, जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा खास आनंद असल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. सांची आता कायमची सातासमुद्राच्या पार राहायला जाणार याचं दुःख आहे. मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबियांनी दिली. या लग्नाची मात्र शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.