पुणे : डेटिंग सर्व्हिसच्या नावाखाली एका ७८ वर्षाच्या ज्येष्ठाला दोन सायबर चोरट्यांनी तब्बल १ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजत सिन्हा, नेहा शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ७८ वर्षाच्या ज्येष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा मे २०२२ पासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना यांना आरोपी नेहा शर्मा या नावाने फोन आला. तिने आपली के बी टेलीकॉम ही डेटिंग कंपनी आहे. असे सांगितले. व डेटिंग सर्व्हिस देण्यासाठी त्यांच्याकडून सुरुवातीला काही पैसे ऑनलाईन भरायला सांगितले.
त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तसेच रिफंडेबल चार्जेस असल्याचे सांगून आरोपींनी वेगवेगळ्या खात्यात पैसे भरायला सांगितले. त्यानुसार ते पैसे भरत गेले. त्यानंतर तुम्ही बेकायदेशीरपणे डेटिंग सर्व्हिस घेण्याचा प्रयत्न केला. तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, समाजात तुमची बदनामी करु, अशी धमकी देऊन गेले वर्षभर त्यांच्याकडून पैसे उकळले.
दरम्यान, फिर्यादी यांनी तब्बल १ कोटी २ लाख १२ हजार ८०० रुपये आरोपींना ट्रान्सफर केले. तरीही त्यांच्याकडून पैशांची मागणी होत होती. त्यामुळे फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रजत सिन्हा, नेहा शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे सायबर पोलीस करीत आहेत.