पुणे : जंगली महाराज रस्त्यावर फुगे विक्री करणारी तीन लहान गुरुवारी (ता. ०२) मुले बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनाबाई शंकर काळे (वय-१०), दत्तु शंकर काळे (वय-७), आरती शंकर काळे (वय-५) अशी बेपत्ता झालेल्या लहान मुलांची नावे आहे. याबाबत मुलांची आई आयना शंकर काळे (वय-३५ रा. फुटपाथ, जंगली महाराज रोड, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात शुक्रवारी (०२) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयना शंकर काळे यांना तीन मुले आहेत. फुटपाथवर राहून फुगे विक्री करण्याचा व्यवसाय त्या करतात. दोन दिवसांपूर्वी त्या मुलांवर ओरडल्याची प्राथमिक माहिती आहे. आई रागावल्याने मुले कुठेतरी निघून गेल्याची शक्यता आहे. पोलीस फिर्यादी यांच्या नातेवाईकांकडे मुलांबाबत चौकशी करत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत.