लोणी काळभोर, (पुणे) : मागील सहा दिवसांपासून आळंदी म्हातोबा (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मुक्कामी असलेल्या सद्गुरू बाळू मामा यांच्या पालखीला आळंदी म्हातोबा ग्रामस्थांनी सकाळी मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामदरा येथून रविवारी (ता. २९) पालखीचे आळंदी म्हातोबा श्री म्हातोबा जोगेश्वरी देवस्थान जागेत पालखी सोहळ्याचे गावकऱ्यांनी उत्साहात वाजत गाजत स्वागत केले.
आळंदी म्हातोबा ग्रामस्थांनी वाड्या, वस्त्या, भावकीनुसार रोजच्या सकाळ संध्याकाळच्या अन्नदान पंगती वाटून घेतल्याने दररोज हजारो लोकांना अन्नदान झाले. पालखी तळावर दररोज सकाळी व रात्री नऊ वाजता आरती झाल्यानंतर भजन, कीर्तन व पालखीच्या दर्शनाचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घेतला. तसेच त्यानंतर महाप्रसाद होत असे.
सहाव्या दिवशी सर्व गावातील महिलांनी पुरण पोळ्या आणल्या होत्या. दोन ट्रेलर पुरण पोळी महाप्रसाद साठी जमा झाल्या होत्या. शेवटच्या दिवशी सकाळी आरती महाप्रसाद उरकल्यानंतर मिरवणूक काढत, सर्व रस्त्याने रांगोळ्या काढत बाळू मामांच्या पालखीला निरोप देण्यात आला.
दरम्यान, बाळू मामाच्या पालखीमूळे मागील सात दिवस सर्व गाव गट तट राजकारण बाजूला सारून एकत्र आनंदाने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला एक वेगळाच रंग चढला होता. आळंदी म्हातोबा इथून निघालेली पालखी तरडे (ता. हवेली) मुक्कामी गेलेली आहे.