पुणे : रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस अनेक मार्गावरुन जात आहे. मुंबई सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची गुरुवारी (ता.२ ) यशस्वी चाचणी पार पडली. १० फेब्रुवारीपासून वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे.
सोलापूरवरुन मुंबई जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच या रेल्वे गाडीची गुरुवारी (ता. २) चाचणी पार पडली आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे. ताशी १३० किलोमीटर वेगाने ही गाडी धावणार आहे. ती पुण्यातून जाणार असल्याने पुणेकरांना ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा प्रवास अनुभवता येणार आहे.
सकाळी ६.५० वाजता वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सुटेल आणि पुण्यात सकाळी ९ वाजता पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी १२. ३० वाजता मुंबईला पोचेल. त्याच दिवशी दुपारी ४ .१० वाजता ही ट्रेन पुन्हा मुंबईहून निघेल, सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला पोहचेल आणि रात्री १०.४० वाजता सोलापूरला पोहचणार आहे. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस उपलब्ध असणार आहे.