पुणे : कोणती परवानगी न घेता मोक्कातील आरोपीला घर झडतीसाठी घेऊन जाताना आरोपीला पलायन करण्यास मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक रामदास झुंबर मुंढे आणि पोलीस नाईक महेश राजेंद्र जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड येथील आंगडियाच्या कार्यालयात शिरुन अविनाश गुप्ता याच्या टोळीने गोळीबार करत तब्बल २८ लाख रुपये लुटून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुप्ता याच्या टोळीला अटक केली. त्यांच्यावर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गेल्या महिन्यात मोक्का कारवाई केली होती.
त्याचा तपास वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे देण्यात आला होता. असे असताना रामदास मुंढे व महेश जाधव यांनी यातील ९ आरोपींपैकी संतोष पवार व साई कुंभार यांना कोणतीही परवानगी न घेता पोलीस कोठडीतून बाहेर काढले. त्याला घर झडतीसाठी खानापूर येथे घेऊन येत असल्याचे साई कुंभार याचा मित्र राकेश नवसरे याला मोबाईलवरुन दिली.
दरम्यान, कोणताही पुरेसा पोलीस बंदोबस्त न घेता दोघांना खानापूरला घेऊन गेले. त्यानंतर संतोष पवार हा पळून गेला. आरोपी पळून जाण्यास पोलीस कर्तव्यात बेजबाबदार व बेफिकीर गैरवर्तन कारणीभूत ठरल्याने सहपोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी दोघांना निलंबित केले आहे.