पुणे : पूर्व वैमनस्यातुन जबरी चोरी करून मारहाण करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीसांनी संयुक्त कामगिरी करीत ताब्यात घेतले आहे.
तेजस नियाज वाघिले (वय – २१, रा. सद्याचिल कॉम्प्लेक्स ब बिल्डिंग फ्लॅट न ४०१ कोल्हेवाडी, ता. हवेली), विजय दत्तात्रय साळुंखे, वय-१९, रा. ग्रासलँड सोसायटी जवळ कोल्हेवाडी, ता. हवेली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत २७ जानेवारीला फिर्यादी राहुल अनिल गायकवाड यांना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास धायरी येथुन व्यायाम करून येत असताना ४ अनोळखी इसमांनी त्यांना अडवुन तु राकेश मोरे व शिवाजी मते यांना त्रास का देतो असे म्हणुन त्यातील दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील ५ तोळे सोन्याची चैन व खिशातील रोख रक्कम १७ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून नेले बाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा तेजस वाघिले व विजय साळुंखे यांनी मिळून केला असून ते पानशेत बाजारपेठ येथे येणार आहेत. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंघाने त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्यची कबुली पोलिसांना दिली आहे. सदर आरोपींना पुढील तपास कामी हवेली पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक, मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले-पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, नेताजी गंधारे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, हवेली पोलीस स्टेशन कडील सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे, पोलीस नाईक गणेश धनवे, रजनीकांत खंडाळे यांनी केली आहे.