सागर जगदाळे
भिगवण : पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनातर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध कला, सुप्तगुण दाखवण्यासाठी असे कार्यक्रम गरजेचे असल्याचे मत यावेळी संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी व्यक्त केले.
सरपंच इंद्रायणी मोरे यांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील सातशेहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यवादन सादरीकरणाबरोबर पर्यावरण रक्षण संदेश, मोबाईलचे दुष्परिणाम, स्त्री शिक्षणाचे महत्व, पाणी बचत यांसारखे कार्यक्रम सादर केले.
इतिहास सांगणाऱ्या गाण्यांसह समाजप्रबोधन, शेतकरी नृत्य, पारंपारिक लावणी, लोककला, देशभक्तीपर गीत कार्यक्रमाबरोबर हिंदी-मराठी गाण्यांवर नृत्यकला सादर केली .सुमारे पाच तास चाललेल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या कलेला प्रतिसाद म्हणून ग्रामस्थांकडुन सुमारे ५० हजार रुपये बक्षीस जमा झाल्याची माहिती प्राचार्य बिभीषण शेरखाने यांनी दिली.
कार्यक्रमासाठी निराभिमाचे संचालक राजवर्धन पाटील, इंदापूरचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरिक्षक महेश माने, संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे, बबन काळे तसेच पळसदेव व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, पालकवर्ग यासह हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले. तर तानाजी इरकल यांनी आभार मानले.