लोणी काळभोर, (पुणे) : प्रेमसंबंधातून अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तिने एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या आईच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता या नराधमाने तिच्या घरासमोर येऊन धिंगाणा घालून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. ०१) उघडकीस आला आहे.
सुरज भारत पवार (वय २६, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १७ वर्षाच्या मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज पवार व फिर्यादी १७ वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध होते. ती मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यातून फिर्यादी ही गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला. गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये तिच्या आईने फिर्याद दिल्याने सुरज पवार याच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्कार व पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, बुधवारी (ता. ०२) फिर्यादी या लोणी काळभोर या ठिकाणी राहत असलेल्या ठिकाणी आला व फिर्यादीचे नाव घेऊन मोठमोठ्याने ओरडू लागला व सदर ठिकाणी धिंगाणा घालू लागला. तसेच फिर्यादीचा पाठलाग केला. त्यामुळे १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुरज पवार याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.