उरुळी कांचन, (पुणे) : जिल्हा परिषद (शिक्षण विभाग), आणि डायट आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धा -२०२२ स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयाला जिल्हा स्तरावर छोट्या व मोठ्या अशा दोन्ही गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. छोटा गटात इयत्ता ६ वी ७ वी तील विद्यार्थांचा तर मोठ्या गटात नववी व दहावीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य भरत भोसले यांनी दिली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ, पुणे येथे तालुक्यातील प्रथम क्रमांक असलेल्या ६९ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाने सादर केलेल्या ‘कटपुतली’ या हिंदी नाटकाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
तसेच कट पुतली नाटकामध्ये उत्कृष्ठ अभिनय स्पर्धेत धनू या भूमिकेसाठी संदेश शिंगाडे या विद्यार्थ्याने व गुडीया या भूमिकेत मधुरा खवळे या विद्यार्थिनीने पारितोषिक पटकावले.
दरम्यान, उत्कृष्ट दिग्दर्शन शाळेचे अध्यापक राजेंद्र बोधे व राणी काळभोर यांना मिळाले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत भोसले, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सर्व पदाधिकारी सर्व विश्वस्त, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व अध्यापकांचे कौतुक करून अभिनंदन केले.