पुणे : एकटी महिला पाहून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्यांना सिंहगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यामुळे पकडलेल्या गुन्हेगारांमुळे दहा गुन्ह्यांची आतापर्यंत उकल झाली आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय.२०, रा. मंतरवाडी), राजु महादेव डेंगळे (वय १९, रा. कात्रज कोंढवा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा आणखी एक साथीदार गजानन दत्तात्रय बोर्हाडे (वय. ३०) हा पसार झाला आहे. याप्रकणी धायरीतील एका महिलेने फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून अज्ञात चोरटे पसार झाले होते. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यावेळी पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर व अमोल पाटील यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोन साखळी चोरटे सनसिटी रस्त्यावर येणार आहेत.
त्यानुसार, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात पथकाने सापळा रचला. दोघे संशयित दिसताच त्यांना पकडले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना लगेचच ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर सखोल तपास केला असता संबंधित गुन्हा केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांना या गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीत त्यांच्याकडे सखोल तपास केला. त्यात शहरातील १० गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्यांच्याकडून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त देखील जप्त करण्यात आला आहे.या घटनेचा तपस पोलीस करत आहेत.