लोणी काळभोर : ‘प्रेमाचा चहा’ या कंपनीच्या रिटेलरशिपच्या नावाखाली तब्बल १ कोटी ६७ लाखाचा गंडा घालणाऱ्या दोन तत्कालीन संचालकांच्या विरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफ्रोडील्स, मगरपट्टा सिटी, हडपसर आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे (रा. माळवाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धार्थ पंढरीनाथ भाडळे (वय ३८, रा. उरुळी देवाची, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाचा चहा प्रा. लि.कंपनीवर आरोपी अमित मगर आणि स्वप्निल तुपे हे संचालक म्हणून काम करीत होते. तेव्हा आरोपींनी कंपनीचा जीएसटी भरणा केला नाही. तसेच कंपनीचा आयकरही भरला नाही. कंपनीच्या खात्यात जमा होणारी रक्कम परस्पर स्वत:च्या खात्यात वळती करुन अनाधिकृतपणे आऊटलेटचे वाटप केले. तसेच फिर्यादी विक्रांत भाडळे यांना कंपनीच्या फेसबुक पेजवरुन ७ जून २०२१ रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता अनाधिकृतपणे रिमूव्ह केले. तसेच कंपनीने रिटेलरबरोबर केलेले लिखीत अग्रीमेंट गहाळ झाल्याचे खोटे सांगितले.
त्यानंतर आरोपी अमित मगर आणि स्वप्निल तुपे यांच्याकडे कंपनीचा कसल्याही प्रकाराचे अधिकारी नसताना, आरोपींनी संगनमत करुन आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील रिटेलर यांना अनाधिकृतपणे प्रेमाचा चहा नावाने फ्रँचायझीजचे वाटप केल्या. आणि प्राप्त झालेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात स्वीकारली. त्यानंतर कंपनीच्या लोगोचा अनाधिकृतपणे वापर करुन कंपनीचा रजिस्टर मोबाईलची चोरी करुन कंपनीची दिशाभूल केली. खोटी कागदपत्रे तयार करुन कंपनीची तब्बल १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादी भाडळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तत्त्कालीन संचालक अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफ्रोडील्स, मगरपट्टा सिटी, हडपसर आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे (रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षकअमोल घोडके तपास करीत आहेत.