पुणे : तुला टीसीकडे देईन अशी धमकी देत एका १४ वर्षाच्या अनाथ मुलीवर धावत्या झेलम एक्स्प्रेसमध्ये पॅन्ट्री कारमधील एका कर्मचाऱ्यांने बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (ता. १९) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
झेलम एक्स्प्रेसमध्ये ही संतापजनक घटना घडल्याचं उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी घोरपडी (ता. हवेली) येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी भोपाळहून झेलम एक्स्प्रेस पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी पीडित मुलगी विनातिकीट झेलम एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होती. ती एका एसी कंम्पार्टमेन्टमध्ये असताना तिची पॅन्ट्रीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने चौकशी केली. तुला टीसीकडे देईन, अशी भीती घालत कर्मचारी तिला पॅन्ट्री कारमध्ये घेऊन गेला. तिथे नेत त्यानं तिला जेवणं देतो, असं म्हणत भूलही लावली. यानंतर तिच्यावर पॅन्ट्रीत बलात्कार केला. यावेळी इतर दोन कर्मचारीही होते. पण त्यांनीहि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर तिला भुसावळ रेल्वे स्थानकात उतरविले.
भुसावळ येथे पीडितेची एका सामाजिक संस्थेनं चौकशी केली. त्यानुसात घडलेल्या घटनेची माहिती पीडितेनं संस्थेला दिली. त्यानंतर एनजीओच्या मदतीने पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केली व तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेनं दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीबाबत भुसावळ जीआरपीकडून पुणे जीआरपी पथकाला कळवण्यात आलं. या कर्मचाऱ्यांचा गणवेश, त्यांची चेहरापट्टी याच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर हे आरोपी घोरपडी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनीहा सगळा परिसर पिंजून काढत अखेर बलात्कार प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.