पुणे : ‘जर्मनीमध्ये नोकर बायकाही तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन योगराज ग्रोवर (वय.४३, रा. सेरेनो, पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर, पुणे सध्या रा. जर्मनी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
आरोपी हा मूळचा बाणेर येथील रहिवासी असून जर्मनीत तो व्यवसाय करतो. याप्रकणी पीडित महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्य़ादी हे उच्चशिक्षित आहेत. आरोपी पवन ग्रोवर जर्मनीत काम करत असून तो त्या ठिकाणी स्थायिक झाला आहे. त्यांचे २००६ मध्ये लग्न झाले. लग्न झाल्यानंतर आरोपी पवन ग्रोवर याने पत्नीला त्रास देऊन तिचा छळ करायला सुरुवात केली.
त्यानंतर आरोपी पवन ग्रोवर याने ‘तू सुंदर दिसत नाही, तू मला आवडत नाहीस, तू वेडसर आहेस, तुला मॉडर्न मुलीसारखे राहणे जमत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस, जर्मनीमध्ये नोकर महिला पण तुझ्यापेक्षा चांगल्या आहेत’, असे म्हणून वारंवार पत्नीला त्रास दिला. पत्नी माहेरी निघून जावी, यासाठी आरोपीने त्यांना त्रास दिला. तसेच पूर्णपणे बरबाद करुन टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, याप्रकणी पिडीत महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पवन योगराज ग्रोवर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.