पुणे : मित्राच्या पत्नीला तोंडावर ऍसिड टाकून चेहरा विद्रूप करण्याची आणि मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाऊ आणि बहिणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ३९ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार साजिद मोहम्मद अली कुंजू (वय – ३९) आणि हसीना अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील साजिद याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साजिद हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र असल्याने दोघांची ओळख होती. आरोपीने फिर्यादी महिला मोबाईलवर फोन करत तू मला खूप आवडतेस, माझ्यासोबत मैत्री कर, शारीरिक संबंध ठेव, जर नकार दिला तर मी तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पाठवीन अशी धमकी दिली होती. २०२१ पासून वारंवार हा प्रकार घडत होता.
आरोपीने फिर्यादी महिलेला ठार मारण्याची ही धमकी दिली होती. तुझ्या तोंडावर ऍसिड टाकेल व तुझा चेहरा विद्रूप करेल. मुलाचे अपहरण करेल अशी धमकी देऊन आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात शरीरसंबंध ठेवले होते. या सर्व प्रकारानंतर आरोपीने फिर्यादीला वारंवार फोन करून पैशाची मागणी केली.
दरम्यान, आरोपीची बहीण असलेल्या दुसऱ्या आरोपीने भावासोबत लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.