पुणे : झेंडावंदनला एकाच गाडीवरुन रील बनवत जात असताना चार विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना गुरुवारी (ता.२६ ) सकाळी सातच्या सुमारास परभणी येथील पाथरी सोनपेठ मार्गावर घडली आहे.
शंतनू सोनवणे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर स्वप्नील चव्हाण, राहुल तिथे, योगानंद घुगे (सर्व रा. डाकू पिंपरी) असे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी कानसुर येथील चक्रधर स्वामी विद्यालयात इयत्ता नववीत शिकत असून प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत झेंडावंदनासाठी जात होते. गाडीवर जात असताना विद्यार्थी ‘मेला’ चित्रपटातील ‘डर है तुझे किस बात का?’ या गाण्यावर रील तयार करत होते. रील बनविण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीला रिक्षाने धडक दिली.
यात चारही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. बाकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.