दीपक खिलारे
इंदापूर : आपल्या देशाच्या इतिहासामध्ये १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी आदराचे आणि अभिमान वाटणारे हे दोन दिवस आहेत. भारताने सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती केली आहे तसेच आपल्याला जी २० चा बहुमानही मिळाला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील बोलत होते.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी परेड कमांडर सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धी भोंगच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट संचलन केले. उपस्थितांनी टाळ्यांची दाद देत या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन रांगोळीच्या माध्यमातून साकारले.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ. बाळासाहेब काळे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी देवेश जळमकर आणि अश्विनी जाधव यांनी केले तर आभार क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी मानले.
यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, खजिनदार अॅड. मनोहर चौधरी, संचालक अशोक कोठारी, आबा पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, मनोज मोरे, मच्छिंद्र शेटे, गोरख शिंदे ,दत्तू पांढरे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे आदी उपस्थित होते.