लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत महामार्गाच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब हे तिरंगी विद्युत रोषणाईने उजळुन निघाले आहेत. त्यामुळे डोळ्याचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह स्थानिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
यंदा २६ जानेवारी रोजी देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यामुळे महामार्गाच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबाना करण्यात आलेल्या या रोषणाईमुळे अनेकांना छायाचित्र घेण्याचा व सेल्फी काढण्याचाही मोह आवरता आला नाही. मध्यभागी दुभाजक व सेंटर पोल असलेल्या रस्त्यांवर ही रोषणाई उठून दिसते.
प्रत्येक पथदिपाच्या खांबाला नऊ ते दहा फुटापर्यंत स्ट्रीप लायटिंग करण्यात आली आहे. त्यामुळे हे आकर्षक दिसून येत आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत बोलताना कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड म्हणाले, “तिरंगा विद्युत रोषणाई रात्रीच्या सुमारास नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून यामुळे सर्वांमध्ये देशाभिमान वाढण्यास निश्चितच मदत होईल. तसेच सर्व नागरिकांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे निमित्त जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे – सोलापूर महामार्गावर आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.”