बीड: पाणी तपाविताना हिटरला चिकटलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीलाही विजेचा धक्का बसून दोघांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपळगाव (घोळवे, ता. केज) येथे आज बुधवारी (ता.२५) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्ञानेश्वर आसाराम सुरवसे (वय-५०) आणि इंदूबाई ज्ञानेश्वर सुरवसे (वय-४५) अशी मृत्यू झालेल्या दांपत्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुरवसे व इंदूबाई हे दोघे पतीपत्नी असून पिंपळगाव येथे राहतात. इंदूबाई या नेहमीप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर हिटर लावण्यासाठी पाण्याने भरलेली बकेट घेऊन विजेच्या बोर्डाकडे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गेल्या होत्या.
हिटर लावताच त्यांना विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का बसलेल्या पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक उमेश आघाव आणि पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदणासाठी विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
दरम्यान, सुरवसे दाम्पत्यांना ३ मुली आणि १ मुलगा अशी ४ अपत्य होते. १२ वर्षांपूर्वी १ मुलगी पाण्यात बुडून मृत्यू पावली होती, तर दुसरीने ५ वर्षा पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर एका मुलीचा विवाह झाला असून मुलगा बीडला शिक्षण घेतो आहे. तर अचानक घडलेल्या या दुर्घटनेने सुरवसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे