उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या परिसरात व्हाट्स ॲप स्टेटस वरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी ( ता.२४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हाणामारीत चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी अल्पवयीन मुलांसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये पहिल्या विधी संघर्षीत बालकांने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रेम संतोष कांचन (वय १८ , रा. पांढरस्थळ, स्वामी शाळेशेजारी, उरुळी कांचन, ता. हवेली) व दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या विधी संघर्षीत बालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रेम दत्तात्रय कांचन (वय अंदाजे – १९ ), रुषिकेश चांदगुडे (वय अंदाजे १८), प्रथमेश दत्तात्रय कांचन (वय अंदाजे १८) ,जयेश सुदाम कांचन (वय अंदाजे १८) , चैतन्य अप्पासो महाडीक (वय अंदाजे १८, सर्व रा. उरुळी कांचन, ता. हवेली) व तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वरील सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला अल्पवयीन मुलगा व त्याचे मित्र हे उरुळी कांचन (तालुका हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई ज्युनिअर कॉलेज येथे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी दाखल गुन्हयातील वरिल नमुद आरोपीत इसम तेथे आले व त्यांनी फिर्यादी यांना त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ठेवलेल्या स्टेटस बाबत जाब विचारला. त्याचे कारण सांगणेस फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
तसेच त्यातील एका आरोपीने हातातील लोखंडी रॉड ने फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण करुन जबर जखमी केले आहे. याप्रकरणी पहिल्या विधी संघर्षीत बालकांने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा अल्पवयीन मुलगा व त्याचे मित्र हे पद्मश्री मणिभाई देसाई ज्युनीअर कॉलेज पार्कंग परिसर व ओढयाजवळ थांबले होते, तेव्हा
फिर्यादी यांनी आरोपीला विचारले तुझ्या मोबाईलमधील इन्स्टाग्राम या सोशल मेडीयावर ए. के. व के. के. असे स्टेटस का ठेवले. असे विचारले असता, त्याचा राग आल्याने आरोपींनी त्यांच्याकडील स्टील ची स्टीक, लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण करुन जखमी केले व शिवीगाळ केली आहे.
दरम्यान, या मारहाणीचा माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मारहाण करीत असलेल्या वरील ११ जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
या विद्यार्थ्यांच्या खुलेआम मारहाणीत ४ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून दवाखान्यात उपचार घेत आहेत. या मारहाणीमुळे उरुळी कांचन परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. कायदा व सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.