पुणे : पोटजातीमधील मुलीसोबत लग्न केल्यामुळे श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केलेल्या एकाने पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात जातपंचायत सदस्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
जातपंचायत सदस्य ताराचंद काळूराम ओजा, भरत नेमचंद मावणी, प्रकाश लालूचंद बोलद्रह उर्फ शर्मा, संतोष उणेसा, मोतीलाल भोराम शर्मा डांगी, बाळू शंकरलाल डांगी, प्रकाश असुलाल ओजा, भवरलाल डांगी, हेमराज ओजा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहेत.
प्रकाश नेमचंद डांगे (वय. ४६, रा. हरपळे गल्ली, फुरसुंगी, पुणे) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
लग्नासाठी मुली मिळत नसल्याने या समाजातील तरुणांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न करुन आपला आयुष्याचा जोडीदार निवडला आहे. मात्र, ज्या मुलांनी पोटजातीत किंवा आंतरजातीय लग्न केले आहे, अशा मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाला जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत करत वाळीत टाकले आहे.
पोटजातीमधील मुलीसोबत लग्न केल्यामुळे प्रकाश डांगे याला २३ वर्षापूर्वी समाजामधून बहिष्कृत करण्यात आले होते. अनेकवेळा विनंत्या आणि लेखी पत्र देऊन देखील जात पंचायतीने त्यांची दखल घेतली नाही. यामुळे प्रकाश डांगे यांनी पंचायत सदस्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जातपंचायत सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.