नारायणगाव : शेतकऱ्यांनी घाम गाळून उत्पादित केलेल्या सोयाबीन, भुईमूग शेंगा, कांदे आदी पिकांवर डल्ला मारणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून मोटार, सोयाबीनच्या दहा गोणी असा सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संदिप संभाजी उपशाम (वय. ३४, राहणार बेल्हे ता.जुन्नर ), सुरज विलास भुतांबरे( वय. २६ राहणार वारुळवाडी ता .जुन्नर), सुखरूप सुखदेव नागरे( वय. २५), अभिषेक शंकर मोरे (वय. २०, दोघेही राहणार खोडद ता.जुन्नर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, खोडद येथील प्रविण विलास पानमंद यांनी काढणीनंतर सोयाबीनच्या गोणी शेतावरील घरात साठवून ठेवल्या होत्या. जुलै महिन्यात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचा कडी, कोयंडा तोडून सोयाबीन पिकाच्या पन्नास किलो वजनाच्या वीस गोण्या चोरून नेल्या होत्या. या बाबतची तक्रार पानमंद यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली होती.
या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस तपास करत होते. मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे नारायणगाव पोलिसांना आरोपींना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकारे सोयाबीन, भुईमूग शेंगा, कांदे आदी शेतमालाची चोरी केली असल्याची माहिती पोलिस तपासात आरोपींनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.