लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर (ता. हवेली) यांच्यातर्फे शनिवार, दि. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पाचव्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ”विश्वनाथ स्पोर्टस् मीट- २०२३” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठातील मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन २८ जानेवारीला प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार विजेती आणि ऑलंम्पिक कांस्य पदक विजेती (बॉक्सिंग) लवलीन बोरगोहेन, भारतीय महिला मुष्टियुद्ध संघाचे मुख्य प्रशिक्षक भास्करचंद्र भट, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ १ फेब्रुवारीला प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि अर्जून पुरस्कार प्राप्त, (रोईंग) ऑलंम्पियन दत्तु भोकनाळ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव आणि विश्वनाथ स्पोर्ट समीट 2023 च्या नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा संचालक आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड उपस्थित होते.
डॉ. अनंत चक्रदेव म्हणाले की, विश्वनाथ स्पोर्टस् मीट या स्पर्धेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. कोविड-१९ मुळे गेली दोन वर्ष या स्पर्धा झाल्या नव्हत्या. यंदाच्या स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील विविध महाविद्यालयातील चार हजाराहून अधिक स्पर्धांकांनी यात सहभाग घेतला आहे. यंदा १४ विविध खेळ प्रकारात या स्पर्धा खेळवल्या जातील.
पाच दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत क्रिकेट (पुरुष), कबड्डी (पुरुष व महिला), फुटबॉल (पुरुष व महिला), टेबल टेनिस (पुरुष व महिला), बास्केट बॉल (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष व महिला), बॅडमिंटन (पुरुष व महिला), टेनिस (पुरुष व महिला), वॉटर पोलो (पुरुष), जलतरण (पुरुष व महिला), रोईंग (पुरुष व महिला), मुष्टीयुद्ध (पुरुष व महिला), धनुर्विधा (पुरुष व महिला) आणि बुद्धीबळ (पुरुष व महिला) या स्पर्धा रंगणार आहेत.
या स्पर्धांमध्ये राज्यभरातून दोनशेहून अधिक शिक्षण संस्थांमधील चार हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी होतील. विजेत्या स्पर्धांकांसाठी यंदा १० लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
यात ७ लाख ५० हजाराचे रोख पारितोषिक आणि २.५ लाखाचे मेडल, ट्रॉफी आणि इतर पारितोषिक असणार आहेत. आता पर्यंत या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून ११० संघ आणि ३६०० खेळाडूंनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आणि संघांना नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ww.mituniversity.edu.in/vsm या संकेतस्थळावर स्पर्धेसाठीची नोंदणी आणि नोंदणी शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर, पुणे- 412201 या पत्यावर प्रवेश अर्ज पाठवावे, असे आवाहन ही डॉ. अनंत चक्रदेव यांनी यावेळी केले.
दरम्यान, क्रिकेट व्यतिरिक्त इतर स्पर्धांसाठी 26 जानेवारी 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- सिद्धार्थ गर्ग 8421901110, सुनील मोरे 9763398136. यांना करावा.