पुणे : सोसायटीचा मेटनन्स अर्थात देखभाल कर न भरल्याने बिल्डरने प्लॉट धारकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील केशवनगर परिसरात शनिवारी (ता.२१) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत प्लॉट धारकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तर याप्रकरणी बिल्डरसह ४ जणांच्या विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार शहा (रा. खराडी) व त्यांच्या अनोळखी दोन ते तीन साथीदारांवर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दीपक साहेबराव फडतरे (वय ४०, रा. श्रीकृपा सोसायटी, बालाजी रेसिडन्सी, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार शहा हा केशवनगर (मुंढवा) परिसरातील श्रीकृपा सोसायटीचा बिल्डर आहे. तर फिर्यादी दीपक हे त्याच सोसायटीत बालाजी रेसिडन्सी मध्ये राहतात.
दरम्यान, फिर्यादी दीपक यांनी सोसायटीचा मेटनन्स भरला नाही. या कारणावरुन बिल्डर तुषार शहा व त्याचे दोन तीन साथीदार सोसायटीत शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आले. व आरोपींनी दीपक यांना शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत दीपक यांचा हात फ्रॅक्चर झाला.
याप्रकरणी दीपक फडतरे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बिल्डर तुषार शहा व त्यांच्या अनोळखी दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुतार करत आहेत.