पुणे : बलात्काराची केस मागे घावी, यासाठी महिलेला धमकावून अंगावर पेट्रोल टाकत पेटवून देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार मुंढव्यातील भीम नगर येथून समोर आला असून या प्रकरणात पोलिसांनी एकावर गुन्हा नोंदविला आहे.
रमजान खलील पटेल (वय ६०, रा. भिमनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी एका ३८ वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पतीपासून विभक्त राहातात. कोर्टातील कामानिमित्त त्यांची लष्कर कोर्टात रमजान पटेल याच्याशी ओळख झाली. आरोपीने फिर्यादी यांना बार्शीला घेऊन जात यांच्यावर बलात्कार केला.
त्याबाबत त्यांनी २०१८ मध्ये पांगरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्याची येत्या २३ जानेवारीला कोर्टात तारीख आहे. रमजान पटेल हा आठ दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबासह फिर्यादी रहात असलेल्या इमारतीत रहायला आला.
बुधवारी (ता.१८) सकाळी फिर्यादी या कचरा टाकण्यासाठी खाली गेल्या असताना रमजान पटेल व त्याच्या मित्राने फिर्यादी यांना अडवले. त्यानंतर आरोपी रमजान याने फिर्यादी महिलेला सांगितले की, तु माझ्याविरुद्ध बलात्काराची बार्शी कोर्टात केलेली केस पाठीमागे घे, तेव्हा तुला काय सांगायचे ते कोर्टात सांग असे फिर्यादी महिलेने सांगितले.
त्यानंतर आरोपी रमजान याने त्याच्याजवळील पिशवीतून बाटली काढून त्यातील रॉकेल फिर्यादीच्या अंगावर टाकले. त्यामुळे फिर्यादी यांच्या अंगाची आग होऊ लागल्याने त्यांनी तेथून पळून जाऊन स्वत:चा जीव वाचवला. त्यानंतर महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली.
मुंढवा पोलिसांनी रमजान खलील पटेल याच्यावर खूनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.