लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याशेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने व गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पोलिसांनी संयुक्तरित्या धाड टाकून जुगार खेळणारे व खेळविणारे अशा ५ जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मुख्य आरोपी फरार झाला आहे.
राकेश लोंढे (रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) असे फरार आरोपीचे नाव आहे, तर तो शुभम कामठे टोळीचा सक्रीय सदस्य असून त्याच्यासहित ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पुणे – सोलापूर महामार्गाच्या शेजारी असलेल्या टोल नाक्याच्या शेजारी बेकायदेशिररित्या कल्याण मटका खेळत व खेळवत असल्याची व चोरट्या पद्धतीने वरली मटका जुगार, एका बादशाह जुगार, चोरून लपून खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ६ ला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता यावेळी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच पाच जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मटका चालक राकेश लोंढे हा पळून जाण्यात यशस्वी झाला.
दरम्यान, राकेश लोंढे हा जुगार अड्डा चालवत असून टोळीतील सदस्यांना पैसा पुरवणे, त्यांच्यावर पोलिसांची कारवाई झाली की, त्यांच्या जामीनासाठी आर्थिक आणि कायदेशीर मदत मिळवून देण्याचे व त्यांना आश्रय देण्याचे काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच लोंढे रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून, त्यावर यापुर्वी अनेक गुन्हे दाखल असूनही तो अद्यापही कदमवाकवस्ती परिसरात हद्दीत अवैध धंदे चालवीत असल्याचे युनिट ६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी सांगितले.
सदरची कामगिरी उपनिरीक्षक सुरेश जायभाय, अमंलदार कानिफनाथ कानखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, ऋषिकेश टिहेकर, मच्छिंद्र वाळके, अश्पाक मुलाणी यांच्या पथकाने ही कारवाई केली.