खेड -शिवापूर : पुणे- सातारा महामार्गावर खेड – शिवापुर (ता. हवेली) टोलनाका परिसरात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला पाच आरोपींना राजगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून पोलिसांनी चारचाकी गाडीसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ईस्माईल बाबु सय्यद (वय ३०, रा. कनगल्ला, ता. बसवसर्कल जवळ, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक), सैफाली शब्बीर सुतार (वय २३, रा. निपानी, ता. हुकेरी, जि.बेळगांव, राज्य कर्नाटक), जैनुल गजबार मुल्ला (वय- ३५, रा. सोलापूर दर्गा गल्ली, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक), जिआऊल रेहमान रियाज मुजावर (वय- २०, रा. हरणापूरगड, ता. हुकेरी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक), आजु अजगर अली खान (वय – २१ वर्षे, रा. मानखुर्द, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थाबाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार खेड शिवापुर टोलनाका परिसरात गस्त घालीत असताना एका खबऱ्याकडून पोलीस हवालदार सचिन कदम यांना माहिती मिळाली कि, मुंबई ते निपानी जाणारी चारचाकी गाडीमधील काही इसम गांजा या मादक पदार्थाची वाहतुक करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांना सदर माहिती सांगून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी सापळा रचला व चारचाकी गाडी व त्यात प्रवास करीत असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तसेच गाडीच्या डिक्कीत काळे रंगाचे ट्रॅव्हलींग बॅगमध्ये बेकायदा, बिगर परवाना ८१ हजार ९७० रुपयांचा गांजा हा मादक पदार्थ मिळून आला. तसेच गाडीसह एकुण किंमत ४ लाख ८२ हजार ७० रुपयांचा गांजा मुंबई येथून निपानी येथे वाहतुक करून घेवून जात असताना मिळुन आले.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, पोलीस हवालदार सचिन कदम, अजित माने, संतोष तोडकर, राहुल कोल्हे, सागर कोंढाळकर, खेंगरे, अमित कांबळे, निलेश ओव्हाळ, अमोल सूर्यवंशी, पंकज शिंदे यांचे पथकाने केली आहे.