हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : शेतकरी तसेच महीला बचत गटाने बनविलेला पदार्थच वाण म्हणून देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे शेतकरी व बचत गटातील महिलांना दोन पैसे मिळतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन एस. एस. ॲग्रो फुडसचे अध्यक्ष सुभाष साठे व त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मला साठे यांनी केले आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण मकर संक्रांत असतो. हा सण खास महिलांसाठी विशेष असतो. सणानिमित्त सुगड पुजण्यापासून पुढील १५ दिवस हळदी-कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. यात महिलांना वाण दिला जातो. याच हळदी-कुंकू सणाचे औचित्य साधून भवरापूर (ता. हवेली) येथील एस. एस. ॲग्रो फुडस या ठिकाणी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभाष साठे व निर्मला साठे यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले.
एस. एस. ॲग्रो फुडस या कंपनीच्या वतीने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला भेट वस्तू ऐवजी एक-एक किलो सेंद्रीय गुळ देण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील एक शेतकरी अत्यंत वेगळ्या पद्धतीने हा गुळ बनवित आहे. पूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा गुळ बनविणारे ते एकमेव शेतकरी आहेत. घरातील लहानपणापासून ते जेष्ठ माणसाच्या आरोग्यासाठी गुळ हा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. त्याचं महत्व समजण्यासाठी व त्या शेतकऱ्याला प्रोत्साहीत करण्यासाठी एस. एस. ॲग्रो फुडसच्या वतीने या गुळाचे वाटप करण्यात आले आहे.
यापुढे बोलताना साठे म्हणाले, “ज्या ठिकाणी महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतील तेथे महिलांनी शेतातून तयार झालेला माल, किंवा एखादया महीला बचतगटाने बनविलेला पदार्थच वाण म्हणून देण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक सण आला की फक्त शेतकऱ्यांच्या खिश्याला जळ बसते इथून पुढे आपण उलट करू प्रत्येक सण आला की शेतकरयाला कसे दोन पैसे मिळतील यासाठी प्रयत्न करूयात. हे सण छोटे दिसतात पण लाखो महीला हा सण साजरा करतात व करोडो रुपयांची उलाढाल होते. त्याचा फायदा आपल्या शेतकरी मित्राला मिळावा एवढीच अपेक्षा आहे.
दरम्यान, सेंद्रीय तांदूळ, घरगुती लोणचं, खपली गहू, पापड, पणत्या, घरगुती पापड, पाणीपुरी, लोकरीचे कपडे, होम मेड कॉस्मेटिक साहित्य, समोसे, मोमोज, विविध प्रकारचे केक, मसल्याचे पदार्थ, महीला जे जे काही घरी बनवतात ते आपण या निमित्ताने खरेदी करून त्यांचे हात बळकट करण्याचेहि आवाहन यावेळी साठे दाम्पत्याने केले आहे.