पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्या कुस्ती दरम्यान पंच म्हणून काम पाहणाऱ्या मारूती सातव यांना फोनवरून चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे असे धमकी दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदर धमकीची फोन रेकॉर्डिंग समोर आली आहे. तर याप्रकरणी सातव यांचा केसरी स्पर्धा अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केली असून आता कोथरूड पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र केसरीत मातीच्या अंतिम फेरीत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांची कुस्ती झाली. महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत ४ गुण मिळवत सिकंदर शेखवर ५-४ अशी आघाडी घेतली. पण महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील डांग हा डाव ही व्यवस्थित झाला नव्हता. मग सिकंदरला चार गुण कशाचे दिले गेले? असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले होते. याचा जाब विचारण्यासाठी मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी थेट पंच मारुती सातव यांना धमकी दिली.
याबाबत बोलताना पंच मारुती सातव म्हणाले, २० वर्षांपासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धात पंच म्हणून काम करीत आहे. खालची टांग हा डाव महेंद्रने सिकंदरवर लावला होता आणि सिकंदरसुद्धा डेंजर झोनमध्ये गेला होता. तसेच असं मारुती सातव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ वाहा की मी दिलेला निर्णय खोटा आहे असे फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने म्हटले. तेव्हा मारुती सातव म्हणाले की, मला वाटत नाही की मी कुणावर अन्याय केला. मी अन्याय करण्यासाठी नाही तर न्याय करण्यासाठी उभा आहे.