सागर जगदाळे
भिगवण : पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवण ग्रामपंचायत हद्दीत उभ्या असलेल्या टँकरला दुचाकी चालकाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. १५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
अरुण नारायण लवटे (वय – ४४, रा. कोर्टी ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण लवटे हे आपल्या दुचाकीवरून पुण्यावरून राहत असलेल्या मूळ गावी कोर्टी या ठिकाणी दुचाकीवरून निघाले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुणे – सोलापूर महामार्गावर भिगवण ग्रामपंचायत हद्दीत आले असता सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक टँकर उभा होता. महामार्गावर उभा असलेल्या टँकरचा अंदाज न आल्याने पाठीमागून वेगाने दुचाकीसह ते जाऊन जोरात धडकले.
अपघात एवढा जबर होता कि, या अपघातात त्यांच्या दुचाकीचा खीळखिळा झाला व त्याच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तक्रारवाडी येथील एका खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच निधन झाल्याची माहिती दिली. अपघातानंतर टँकर चालक टँकर जागेवरती सोडून पळून गेला.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या वाहने पार्किंग करणाच्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महामार्ग पोलीस तसेच हायवे प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करताना दिसून येत नाही. त्यामुळे महार्गावर वाहनचालकालाच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला दिवसभर आपली वाहने पार्किंग करीत असल्याने आतापर्यंत अनेक अपघातही या ठिकाणी घडले आहेत. अपघात घडल्यानंतर काही दिवस हळहळ व्यक्त करून पुन्हा त्याच ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत.
महामार्गच नव्हे तर सेवा रस्तेही फुल्ल..!
रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली हॉटेल्स, विविध ढाबे, लोकांनी सोयीसाठी अनधिकृतपणे फोडलेले रस्ता दुभाजक, हॉटेलच्या ठिकाणी रस्त्यावर घातलेले गतिरोधक, सेवा रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण यासारख्या अनेक गोष्टी या रस्ते वाहतुकीसाठी असुरक्षित झालेल्या आहेत. महामार्गावर चारचाकी गाड्या थांबवणे, लेनची शिस्त ना पाळणे, यामुळेही अपघातास आमंत्रण मिळत आहे. अशातच जर एखादी दुर्दैवी घटना घडली तरी तात्पुरती मलमपट्टी करायला ही नेतेमंडळी तत्पर आहेत ही सगळी नित्याची बाब होऊन बसली आहे. त्यामुळे प्रशासनाला, नेत्यांना, अधिकाऱ्यांना व वाहतूक पोलिसांना या गोष्टी दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.