लहू चव्हाण
पांचगणी : आमची चळवळ वंचित असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कांसाठीची असून पांचगणीत अनेक शैक्षणिक संस्था व इतर आस्थापना या कामगारांना कमी पगारात ठेकेदारी तत्वावर पिळून घेत आहेत. या कामगारांना नियमानुसार सरळ सेवेत घ्यावे. तसेच सेवा भरतीमध्ये त्यांचीच प्राधान्याने निवड करावी. अशी आग्रही मागणी असल्याचे कामगार सुरक्षा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पांचगणी येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वैराट बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल महाबळेश्वर अध्यक्ष नितीन वन्ने, सरचिटणीस सनी ननावरे व कामगार उपस्थित होते.
पुढे बोलताना भगवानराव वैराट म्हणाले, पांचगणी हे पर्यटन केंद्र व जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र आहे. या ठिकाणावरील सर्व शाळाही सुरू राहिल्या पाहिजेत. आणि आमचा स्थानिक कामगार ही जगाला पाहिजे. ही आमची भूमिका असून या संस्थांमधील प्रत्येक कष्टकरी कामगाराला न्याय मिळायला हवा आणि त्याला त्याच्या घामाचे मोल मिळायला हवे. यासाठी आमचा लढा आहे.
दरम्यान, कमी पगारावर ठेकेदार काम करून घेत आहेत. परंतु कामगार नियमानुसार ज्याने सलग २४० दिवसापेक्षा जास्त काम केले आहे. त्यांना कायम सेवेत घेणे आणि ज्यावेळी अस्थपणांची भरती असेल त्यावेळी याच कामगारांना प्रथम प्राधान्य देण्याची आमची मागणी आहे. असेही वैराट यांनी सांगितले आहे.