राहुरी : सख्ख्या मामालाच एका २१ वर्षीय तरुणीच्या मदतीने चक्क ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून ३० लाखाची खंडणी मागणाऱ्या भाच्याला व तरुणीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यापाऱ्याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २१ वर्षीय तरुणी व व्यापार्याचा भाचा या दोघांवर गुन्हा रजि. नं. १२/२०२३ भारतीय दंड विधायक कलम ३२८, ३८४, ३८५, ५०६ प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोल्हार खुर्द (ता.राहुरी. जिल्हा अहमदनगर) परिसरात राहतात. फिर्यादीला एका अनोळखी तरूणीने फोन करुन क्रेडीट कार्ड पाहिजे का, अशी विचारणा केली. त्यानंतर दोघांची ओळख होऊन व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्रामवर चॅटींग सुरू झाली. सदर तरूणीने गोड बोलून त्या व्यापार्याकडून काही रक्कम घेतली. ती रक्कम परत घेण्यासाठी व्यापार्याने तरूणीला फोन केला. तेव्हा तिने शिर्डीला आल्यावर तुमचे पैसे देते, असे सांगीतले.
त्यानंतर तरूणीने व्यापार्याला कोल्हार खुर्द येथील एका लॉजवर १७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी बोलावून घेतले. दोघांची भेट झाल्यावर तिने व्यापार्याला प्रसादामध्ये गुंगीचे औषध दिले. नंतर व्यापार्याबरोबर नको त्या अवस्थेत व्हिडीओ तयार केला. तरूणीने व्यापार्याला लग्न कर नाहीतर ३० लाख रुपये दे. अन्यथा तुझा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. या तरूणीने व्यापार्याकडून सुमारे ५० हजार रुपये वसूल केले.
दरम्यान, सदर व्यापार्याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुरी पोलिसांनी तपास करून या गुन्ह्याची उकल केली. सदर गुन्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यातील एक २१ वर्षीय तरुणी व खरा सुत्रधार व्यापार्याचाच भाचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी व्यापार्याच्या भाच्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
हि कामगिरी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत खोंडे, हवालदार सय्यद, महिला पोलीस नाईक कोकेकर यांच्या पथकाने केली आहे.