काठमांडू : नेपाळमध्ये यति एअरलाइन्सचे एटीआर ७२ विमान हे प्रवासी विमान आज रविवारी (ता.१५) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोखरा (जि. कास्की ) येथे कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ४० जणांचे मृतदेह सापडले आहेत.
याबाबत यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितलं की, काठमांडू येथून या विमानाने सकाळी 10:33 वाजता उड्डाण केले. होते. या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. हे विमान पोखरा विमानतळावर उतरत असताना जुने विमानतळ आणि नवीन विमानतळादरम्यान सेती नदीच्या काठावर विमान कोसळले.
दरम्यान,अपघातग्रस्त विमानाला आग लागली असून बचाव कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे. त्यानंतर सर्व बचाव यंत्रणा आग विझवणे आणि प्रवाशांना वाचवणे यावर भर देत आहेत. तर आत्तापर्यंत ४० प्रवास्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.