पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील फायनान्स कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करत मालमत्ता जप्तीचे आदेश मिळवत आहेत, अश्या फायनान्स कंपन्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पिंपरी चिंचवड भाजपच्या महिला आघाडी चिटणीस छाया नितीन पाटील यांनी दिला आहे.
फायनान्स कंपन्यांकडून आरबीआय आणि सेबीने दिलेल्या निर्देशानुसार कामकाज न करता नियमावली जुगारून कामकाज सुरू आहे. यामध्ये सरकार आणि जिल्हाधिकारीचे जप्ती आदेश काढून भीती घालून आर्थिक लूट आणि मिळकत बळकाव बळकावण्याचा प्रयत्न होत आहे.
मायक्रोफायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व राज्य पातळीवर कोणतीही सरकारी यंत्रणा नसल्याने अन्यायग्रस्त व्यक्तीने तक्रार करायची तरी कोणाकडे, असे प्रश्न निर्माण झाले आहे.
खासगी वित्तीय कंपन्यांचा हा व्याज दर परवडणारा नाही. तरीही त्यावर कोणी आवाज उठवत नाही. जरी कोणी प्रश्न उपस्थित केला तरी त्याला रिझव्र्ह बँकेचे मार्गदर्शक तत्त्वे दाखवून परत पाठविले जाते. सामान्य जनतेला या गोष्टी माहीत नसल्यामुळे फायनान्स कंपन्या वेगवेगळे आर्थिक भुर्दंड लावून पैसे उकळण्याचे काम करत आहे.
दरम्यान, फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी कार्यालयीन वेळेच्यानंतर येऊन वसुली करत आहेत, यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे, अनेकजण ताण तणावात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीहि छाया पाटील यांनी केली आहे.