उरुळी कांचन, (पुणे) : रस्ता सुरक्षा फक्त आठ दिवस किंवा ठराविक मोहिमेच्या काळात नव्हे तर आयुष्यभर राबवावी. रस्त्यावर केलेली पहिली चूक ही शेवटची चूक ठरू शकते म्हणून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले तर रस्ते अपघात कमी होतील कदाचित होणारच नाहीत’, असे प्रतिपादन पुणे प्रादेशिक परिवहनचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दिनेश पाटील यांनी केले.
नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अल्ट्राटेक सिमेंट बल्क टर्मिनल पेठ, नायगांव (ता. हवेली) या ठिकाणी ११ ते १७ जानेवारी या दरम्यान ३४ वा सडक सुरक्षा सप्ताह २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.
यावेळी मुख्य युनिट प्रमुख निशा जैन, कंपनीचे लॉजिस्टीक हेड प्रमुख मधुकर सांगा, अल्ट्राटेक सिमेंट पुणे बल्क टर्मिनल पेठ नायगांव येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
यापुढे बोलताना पाटील म्हणाले, “रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी नवीन कायदे किंवा नियम लागू करणे, रस्ते सुरक्षित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करणे किंवा सीट बेल्ट, हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपायांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मोहिमेचा प्रचार या मोहिमेत करण्यात येत आहे.”
कंपनीच्या कर्मचा-यांतर्फे एक लघुनाटीका ‘सुरक्षा अनमोल है’ हि उपस्थित असलेल्या नागरिकांना दाखविण्यात आली. यामध्ये सावन सिंग यांनी यमराजाच्या वेषभूषेत वाहन चालकांची तपासणी केली. त्याचबरोबर चालकांना लायसन्स व इतर प्रमुख कागदपत्रांचे महत्व सांगितले.
दरम्यान, कंपनीच्या उत्पादन विभागाच्या प्रमुख निशा जैन आणि कंपनीचे लॉजिस्टीक हेड मधुकर सांगा यांनी वाहन चालकांचे सड़क सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन कंपनीचे अधिकारी इमरान खान व प्रकाश मोवाडे, विजय चौधरी, नंदराम झगडे, वैभव मुंगी, नितीन कांबळे यांनी केले होते. तर आभार विनायक कोंगारी यांनी मानले.