पुणे : मंचर (ता. आंबेगाव) येथे स्त्री जातीचे अर्भक बेवारस टाकून पळून गेलेल्या माय-लेकीला मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तारा खंडू साळवे (वय.४० रा. एस. कॉर्नर मंचर, ता. आंबेगाव), पूजा आकाश पवार (वय. १९ ) अशी अटक करण्यात आलेल्या आई आणि मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंचर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातील कौटकर भेळ दुकानाशेजारील कचर्याच्या ढिगा-यात एका पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये काळ्या कपड्यामध्ये ४ ते ५ दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक मिळून आले. त्यानंतर त्या अर्भकास तत्काळ उपचारासाठी मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांचे आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी पोलिस सहकार्यांना त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही यंत्रणा तपासण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळखून अर्भकाची आई तारा साळवे आणि पूजा पवार यांना अटक केली. त्यानंतर दोघींनी गुन्ह्याची कबुली दिली असून हे अर्भक तारा यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.