सागर जगदाळे
भिगवण : “आजच्या तरुणाईला माहिती तंत्रज्ञानाच्या युगात चांगले वाईट याची जाण येणे अत्यावश्यक असून माहितीच्या भडीमारात योग्य बाबींचाच स्वीकार करायला हवा. भिगवण परिसरात पोलिस यंत्रणा दुष्प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवत असते. मुलींच्या जडणघडणीवर लक्ष द्यायला हवे. कारण निर्भय आणि सक्षम मुली हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे”, असे प्रतिपादन भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी केले.
भिगवण (ता.इंदापूर) येथील कला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून निर्भय कन्या अभियान एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी वरील प्रतिपादन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. योगीता भोसले, पोलिस निर्भया पथकाच्या अमृता भोईटे, कर्मयोगी सहकारी कारखान्याचे संचालक पराग जाधव, ग्रामपंचायत सदस्य अमितकुमार वाघ, महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य संपत बंडगर, निकिता जाधव, श्रुती काळे, रणजित भोंगळे, कराटे प्रशिक्षक मिनानाथ भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामती कराटे क्लबचे प्रमुख प्रशिक्षक मिनानाथ भोकरे आणि त्यांचे सहकारी यांनी विद्यार्थीनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले.तर लाईफलाईन हॉस्पिटलच्या प्रमुख व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. योगीता भोसले यांनी ‘स्त्रीयांचे आरोग्य जपताना’ या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. तसेच “मुलींनी आरोग्य जपायला हवे. स्वस्थ शरीरात स्वस्थ मन निवास करते आणि मनाचे स्वास्थ्य यशस्वी जीवनाचे रहस्य आहे.”असेही भोसले यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी केले, सुत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी तर आभार प्रा. धनाजी मत्रे यांनी मानले.
याबाबत बोलताना बारामती विभाग निर्भया पथकाच्या प्रमुख व महिला पोलिस हवालदार अमृता भोईटे यांनी अभियानप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या तरुणांनी आपल्या मनाप्रमाणे जगत-वागत असताना समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण आपण कितीही पुरुषप्रधान संस्कृतीचे पाईक असलो तरी कायदा हा स्त्रीयांच्या बाजूने आहे.
कायदा स्त्रीयांच्या विधानाला प्रमाण मानतो. मुलांनी कायदा लक्षात घेऊन आपले करियर अबाधित ठेवण्यासाठी मुलींचे व्यक्तीस्वातंत्र्य जपा आणि मुलींनी कायद्याचा चुकीचा वापर होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन केले.”