पुणे : आंबेगाव येथील चास येथे रांजणखळगे पाहण्यासाठी आलेला एक १८ वर्षीय मुलगा फोटो काढताना पाय घसरून घोड नदीमध्ये बुडाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
साईप्रसाद बालमालकोंडाया वेन्नापुसा (रा. हिरवेतर्फे नारायणगाव, खोडद ता. जुन्नर. मूळ रा. नेरडपल्ली आंध्र प्रदेश) असे या युवकाचे नाव आहे.
तो जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प. सबनिस महाविद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे इ. १२ वीत शिक्षण घेत होता. याबाबत स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे शोधकार्य सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईप्रसाद वेन्नापुसा हा त्याचे मित्र आदित्य सुनील थोरवडे आणि आशुतोष राजेंद्र कोल्हे यांच्यासोबत नारायणगाव येथून दुचाकीवर रविवारी सकाळी चासकडे फिरायला निघाले होते. साईप्रसाद याचा वाढदिवस असल्याने ते फिरायला गेले होते मात्र, चास येथील रांजणखळगे जवळ फोटो काढताना त्याचा पाय घसरला आणि तो घोड नदीत पडला.
याबाबत त्याच्या मित्रांनी त्याच्या घराच्यांना माहिती दिली. त्यांनतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तो युवक गायब झाला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी शोध कार्य सुरू केले सायंकाळपर्यंत अद्यापही तो सापडलेला नव्हता.
या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.