युनूस तांबोळी
शिरूर : गुणवत्तेतून आदर्श उभा करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार पालकांनी केला. त्यावेळी अधिक काम करण्याला प्रोत्साहन मिळाले. पालकांचे हे ऋण शिक्षक आयुष्यभर विसरणार नाहीत. अशी भावना विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी व्यक्त केली.
कान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर गारगोटे व विशेष निमंत्रित म्हणून पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर उपस्थित होते.
कान्हूर मेसाई विद्यालयातील आठवीचे १३ व पाचवीचे ४ असे एकूण १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत.शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाची जाणीव ठेवून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे फेटे बांधून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मेसाई मंदिरात मिरवणुकीचे रुपांतर सभेत झाले.त्यावेळी झालेल्या सभेत पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यालयाने केलेल्या संस्काराची जाणीव व्यक्त केली.आज सत्कार झालेली मुले कान्हूर मेसाई परिसराचा चेहरामोहरा बदलतील कारण ते प्रज्ञावंत आहेत असे गौरवोद्गार काढले.
ह्या गौरव सोहळ्याचे आयोजन संतोष पुंडे, सहादू थोपटे, विनायक गायकवाड, संजय पिंगळे,सूर्यकांत ढगे, लक्ष्मण ननवरे,बाळासाहेब नरवडे,मनोज धुमाळ, वामन मांदळे यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी मुखईच्या सरपंच वर्षाताई रामगुडे, माजी उपसरपंच धर्माजी लांघे, रतन तळोले, सूर्याजी नाणेकर, आनंदी नाणेकर, प्रमिला पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.