पुणे : गृहप्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाख ७५ हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन सुभाष बालवडकर (वय ३५), रोहन सुभाष बालवडकर (वय ३३, दोघे रा. बालेवाडी), सागर वसंत बालवडकर (वय ३५, रा. धायरी), आदित्य दत्तात्रय हगवणे (३३, रा. कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावी आहेत. याप्रकणी कर्वेनगर येथील बांधकाम व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी भागात बांधकाम व्यावसायिकाकडून गृहप्रकल्प बांधण्यात येत आहे. आरोपी बालवडकर, हगवणे गृहप्रकल्पावर गेले. त्यांनी बांधकाम व्यावसायिकाला काम बंद पाडण्याची धमकी दिली. बांधकाम व्यावसायिकाची समाजमाध्यमावर बदनामी करण्याची धमकी देऊन वेळोवेळी २६ लाख ७५ हजार रुपये उकळले
दरम्यान, पैसे उकळल्यानंतर आरोपींनी बांधकाम व्यावासयिकाकडे गृहप्रकल्पातील दोन सदनिका नावावर करून देण्याची मागणी केली आहे. याप्रकणी बांधकाम व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चौघांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.