युनूस तांबोळी
शिरूर : नवनवीन आजार आणि आरोग्याच्या समस्यांमुळे अनेक नागरिक त्रस्त पाहण्यास मिळतात. शुद्ध पाणी व आहारामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा कोणीच विचार करत नाही. मात्र काही शेतकऱ्यांनी यावर उपाय शोधून कुटूंबासाठी शेती करण्यावर भर दिला आहे. बोटावर मोजण्या एवढ्या गुंठ्यात फक्त कुटूंबासाठी फळे, पालेभाज्या तयार करण्यात ते आनंद शोधू लागले आहेत. त्यांच्या या परसबागेतिल सेंद्रिय शेतीचे कुतूहल सध्या परीसरात चर्चेचा विषय ठरू लागले आहे.
शिरूर, आंबेगाव हा परिसर सध्या घोडनदीच्या पाण्यामुळे बागायती क्षेत्र म्हणून नावारूपाला आला आहे. या परिसरात डिंबा उजव्या कालव्याचे पाणी फिरू लागल्याने शेतकरी नगदी पिकांकडे वळाला आहे. या परिसरात भिमाशंकर व पराग साखर कारखाना असल्याने ऊसशेतीकडे शेतकरी वळाला. एकरी उत्पादनात वाढ होऊन चांगल्या उत्पन्नाची हमी असल्याने शेतकरी या परीसरात ऊसाचे उत्पादन घेऊ लागला आहे. रासायनीक खतांचा वापर करून अधिक उत्पादन घेतले जात आहे. कारखान्याच्या माध्यमातून भरघोस पीक घेण्याची चढाओढ सध्या होऊ लागली आहे. या उत्पादनात शेतकरी रासायनिक खतांचा जास्त उपयोग करू लागला आहे. यामुळे जमीनीची पोत दिवसेंदिवस खराब होत आहे.
कांदा पिक घेत असताना शेतकरी खताच्या मात्राचा अधिक वापर करू लागले आहेत. रासायनीक खताच्या वापरामुळे कांदा चाळीत जास्त दिवस कांदा साठा होऊ शकत नाही. हे देखील चित्र अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. कमी दिवसात पालेभाज्या घेऊनअधिक नफा मिळविण्यासाठी शेतकरी भर देऊ लागला आहे. वेगवेगळ्या पालेभाज्या कमी दिवसात बाजारपेठेत येऊ लागल्या आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी या पद्धतीचा अवलंब करू लागल्याने बाजारपेठेत कमी दिवसात भाज्या विक्रिला येऊ लागल्याचे दिसू लागले आहे.
या पद्धतीमध्ये पिकांना दिलेली रासायनिक खतांची मात्रा तसेच औषधांचे टॅानिक यामुळे तत्काळ पिकांची भरभराट होताना दिसते. त्यातून पिकांचे भरमसाठ उत्पादन देखील पहावयास मिळते. या रासायनीक खतांचा वापर सर्वसामान्य नागरिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
सध्याचे थंड, धु्क्याचे व तुरळक पावसाचे हवामान पहाता या पिकांवर पडणारे वेगवेगळे रोग पडत आहेत. त्यामुळे शेतकरी या दरम्यान असणाऱ्या पिकांवर वेगवेगळ्या कंपनीचे औषध फवारताना दिसू लागले आहे. या औषधांचा परिणाम पिकांवर व आरोग्यावर काय ? कसा ? होतो याच्या प्रबोधनाकडे कुणीही लक्ष देत नाही. फक्त भरघोस उत्पादन घेऊन मिळणारा नफा कसा जास्तीत जास्त होईल. याकडे सर्व जण पाहू लागले आहे.
काही शेतकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असल्याने कुटूंबापुरती शेतीकडे अनेकजण वळालेले पहावयास मिळू लागले आहेत. कुटूंबाच्या उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय शेती करण्याकडे ते भर देऊ लागले आहेत. यामध्ये पाच ते दहा गुंठे जागा शिल्लक ठेवू लागले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे तयार करून केले जात आहे. त्यांची ही सेंद्रिय शेती त्यांच्या कुटूंबापुरती असली तरी देखील मित्र व सहकारी शेतकऱ्यांना चर्चेचा विषय ठरू लागली आहे.
सेंद्रिय शेतीचे महत्व ओळखून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने परसबागेतील फळबाग लागवडीसाठी इच्छूक महिलांना २० ते २५ प्रकारची वेगवेगळी बियाणे प्रत्येक गावात मोफत उपलब्ध करून दिली आहेत. अशी माहिती ए. बी. जोरी, कृषीसहाय्यक यांनी दिली आहे.
कुटूंबापुरती सेंद्रिय शेती केली तर मिळणारे पिक कुटूंब व मित्रांनी आहारात वापरली तरी देखील आरोग्याच्या समस्या सुटण्यास मदत होईल. त्यामुळे घराशेजारी शेतीचा काही भाग कुटूंबासाठी ठेवत असून त्याचा फायदा कुटूंबाला होत आहे. अशी माहिती सुदर्शन भाकरे, पोलिस पाटिल, चांडोह यांनी दिली आहे.
रासायनिक खताच्या मात्रामुळे आहारात चुकीच्या पालेभाज्या येऊ लागल्या आहेत. काही प्रमाणात ही सेंद्रिय शेती केल्याने कुटूंबाला चांगला आहार तयार करू शकतो. त्यातून दवाखान्याचा खर्च वाचू शकतो ही भावना निर्माण झाली आहे. अशी माहिती शेतकरी ,भाऊसाहेब पानमंद
निवृत्तीनंतर फक्त सेंद्रिय शेती करण्याकडे कल आहे. त्यातून वेगवेगळ्या फळ व पालेभाज्या दहा गुंठ्यात करू लागलो आहे. भविष्यातील नव्या पिढिला शेतीची पोत सुधारण्यासाठी व सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी हा प्रयोग करू लागलो आहे. दत्तात्रेय वाळुंज,( निवृत्त शिक्षक, खडकवाडी) यांनी दिली आहे.