पुणे : पुणे रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एक महिला घसरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विनोदकुमार मीना असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर, राजलक्ष्मी दीपक नायर (वय ३५, रा. येरवडा) असे महिलेचे नाव आहे
मिळालेल्या माहिती नुसार, राजलक्ष्मी नायर या मुलगी व पतीसोबत प्रगती एक्सप्रेसने मुंबईला जाण्यासाठी निघाल्या होत्या. पाच क्रमांकाच्या फलाटावरून गाडी निघणार होती. त्यांना फलाटावर पोहोचण्यास काही उशीर झाला. या काळात गाडी सुरू झाली होती आणि हळूहळू वेग धरत होती. राजलक्ष्मी नायर यांचा पती आधी धावत्या ट्रेनमध्ये चढले. त्यानंतर राजलक्ष्मी नायर यांनी आपल्या मुलीलाही ट्रेनमध्ये चढवले. मात्र त्या स्वत: चढत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या प्लॅटफॉर्मवर व रेल्वेच्यामध्ये पडल्या.
दरम्यान, ही घटना तिथे जवळच असलेल्या पोलीस कर्मचारी विनोदकुमार यांच्या लक्षात आली. त्यानंतर रेल्वे पोलीस कर्मचारी विनोदकुमार यांच्या बरोबर इतर प्रवाशांनीही मोठ्या शिताफीने नायर याना बाजूला करत त्यांचा जीव वाचवला. घटनेमध्ये नायर यांच्या पोटाला जखम झाल्याने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कामगिरीबद्दल विनोदकुमार मीना यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.