कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करून सार्वजनिक कार्यक्रमात सतत गोंधळ घालून समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कर्जत मधील एकावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
स्वप्नील उर्फ सनी राजेंद्र पवार (रा. कर्जत) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील उर्फ सनी पवार याने राशीन (ता. कर्जत) येथे सार्वजनिक शिवजयंती मिरवणुक सुरू असताना एका इसमास मारहाण करून दुखापत केली होती. तसेच कर्जत शहरात १४ एप्रिलला डॉ. बाबसाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणुक सुरू असताना सदर ठिकाणी वाद झाल्यानंतर त्याने तिथेही एकास मारहाण केली होती. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यात स्वप्नील उर्फ सनी पवारवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्वप्नील उर्फ सनी पवार हा उत्सवांमध्ये वारंवार वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेऊन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आरोपीस दोन महिन्याच्या कालावधीकरता कर्जत तालुक्याच्या हद्दीत प्रवेश बंदीबाबत आदेश करण्याची विनंती उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने आरोपीस एक महिना कर्जत तालुक्याच्या स्थळसिमा हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा आदेश दिला होता.
मात्र प्रतिबंध कालावधी संपताच त्याने ३ सप्टेंबर रोजी एका युवकास वनविभागाच्या कार्यालयाजवळून जात असताना ‘तू माझ्याकडे का बघतो? असे बोलून शिवीगाळ व लथाबुक्क्यांनी मारून त्याच्या डोक्यात वीट मारली. हा वाद दोन्ही समाजात तेढ निर्माण करणारा ठरू शकत होता. या बाबींचा विचार करता आरोपीवर दुसऱ्यांदा क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस हवालदार सलीम शेख, उद्घाव दिंडे यांनी केली आहे.